मुंबई - भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवास्थानी जवळपास १ तास बंद दाराआड चर्चा झाली. यामध्ये सध्याचे राजकीय चित्र आणि राज यांची आगामी भूमिका याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर पुणे मेळाव्यादरम्यान पहिल्यांदाच सक्रीय झालेले पाहायला मिळाले होते. मागील दोन महिन्यात झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी सर्व महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. राज्यात तयार झालेल्या नवीन राजकीय समीकरणांमुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे यावेळी राज म्हणाले होते.
आता भाजप नेते आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. याबाबत शेलार यांना विचारले असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, ही मैत्रीपूर्ण भेट असल्याचे मनसेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.