मुंबई - आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आशांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आशा व गट प्रवर्तक मानधन वाढीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे. आंध्र प्रदेश सरकारने आशा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे दरमहा १० हजार रुपये मानधन सुरू केले आहे, महाराष्ट्र शासनाने देखील आमचे मानधन वाढवावे, अशा विविध मागण्या घेऊन आशा गट प्रवर्तक कर्मचारी पुन्हा एकदा आझाद मैदानात आल्या आहेत.
आशा कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, आशा गट प्रवर्तक कर्मचारी यांना दिलेले वेतन वाढीचे आश्वासन पूर्ण करावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. आयटक संलग्न सर्व आशा जिल्हा संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. मोठ्या संख्येने या महिला कर्मचारी आझाद मैदानात आंदोलनासाठी बसल्या आहेत. आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या कार्यकारी एम.ए. पाटील यांनी सांगितले.
हजारो आशा प्रवर्तक महिलांना कित्येक वर्षांपासून सरकार निराश करत आहेत. त्यामुळे यावेळी सरकारने जर मागण्यांना दाद दिली नाही तर हजारो महिला कर्मचारी या निवडणुकीत सरकारला निराश करण्याची भूमिका घेतील, असे आशा प्रवर्तक महिलांनी यावेळी सांगितले.