मुंबई : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न ( Karnataka Maharashtra Boundary Question ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) यांनी काल देशाचे गृहमंत्री अमित शाहा ( Home Minister Amit Shah ) यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा यांनी पत्रकार परिषद घेत असताना सीमा भागाचा राजकारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने करू नये असे वक्तव्य केले होते.
दोन्ही राज्यांनी भूमिका घ्यावी : गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, काल झालेल्या बैठकीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची नरमाईची भूमिका दिसत असून बैठकीत ठरल्या प्रमाणे दोन्ही राज्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच आज आपण राज्यात विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. या आधी आपण सत्तेत आणि विरोधात असे दोन्हीही बाजूने काम केले आहे. मात्र कोणीतरी ट्विटरच्या माध्यमातून वाद निर्माण केला असे काहींना वाटते आहे. पण राज्याच्या किंवा देशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचेल असे कधीही वर्तन केलेले नाही. मात्र तरीही केंद्र सरकारला किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत शंका कुशंका असल्यास, त्यांनी याबाबत भूमिका घ्यावी. तसेच दूध का दूध पानी का पानी करावे असे अजित पवार म्हणाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले.
मास्टर माइंड कोण? कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे निपाणी, कारभार, बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र सध्या हा मुद्दा चर्चेत नव्हता. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक हा मुद्दा बाहेर कसा आला? या मागचा मास्टर माईंड कोण? असा सवालही अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी बेळगाव, निपाणी, कारवार याच्यासह सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर आपला हक्क सांगणारा विवादित वक्तव्य केलं. त्यामुळे हा सर्व वाद पुन्हा एकदा सुरू झाला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणार होतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
सकारात्मक चर्चा व्हावी : महाराष्ट्र कर्नाटक विवादित सीमा भागावर राज्यातील दोन्ही बाजूनी कोणीही काहीही बोलू नये या प्रकरणावर महाराष्ट्रातील तीन आणि कर्नाटक मधून तीन अशी सहा मंत्र्यांची समिती नेमण्यात येणार आहे. मात्र याआधीही अनेक वेळा अशा प्रकारच्या समित्या नेमण्यात आल्या या मुद्द्यावर अनेक वेळा दोन्हीकडून एकत्रित रित्या चर्चाही झाल्या आहेत. मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नाही. पण यावेळी दोन्ही राज्याची अस्मिता न दुखावता या चर्चेतून तोडगा निघावा अशी आपली भावना असल्याचे अजित पवार यांनी यावेळी म्हणाले.
परवानगी नाही तरी मोर्चा : महाविकास आघाडीने १७ डिसेंबरला विराट मोर्चा करणार आहे. यासाठी सर्व पक्ष नेत्यांची बैठक बोलवण्यात आली असल्याचाही यावेळी अजित पवार यांनी सांगितले महापुरुषांच्याबाबत सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद या मुद्द्यावर हा मोर्चा निघणार असून केवळ राजकीय पक्षच नाही. तर या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी कडून करण्यात आले आहे. अद्याप या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. मात्र विरोधकांकडून अशा प्रकारे काढण्यात येणाऱ्या मोर्चा ना सत्ताधारी पक्ष आणि पोलिसांकडून परवानगी दिली जात नाही, मात्र तरीही आम्ही हा मोर्चा काढणारच असा इशारा अजित पवार यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे.