मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके ( Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. या मतदानाला दिवसभर अत्यंत अल्प प्रतिसाद ( Very short response ) मिळला. निवडणूक आयोगाकडून आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण दिवसभरात फक्त 31.74 इतके कमी मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी ऐकून 7 उमेदवार रिंगणात होते. यात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात चार अपक्ष व दोन इतर पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. या एकूण सात जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
कोणत्या टप्प्यात किती मतदान ? निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले. अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली.
मुरजी पटेल यांनी केले मतदान : सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारण आठ वाजताच्या सुमारास मुरजी पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीला निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केल्यानंतर ही लढत ऋतुजा लटके विरुद्ध मूर्ती पटेल अशी होईल अशा चर्चा होत्या. त्यानुसार भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पटेल जेव्हा मतदान केंद्रावर आले होते त्यावेळी त्यांनी 'सत्याचा विजय होईल. भ्रष्टाचाराचा पराभव होईल' अशी प्रतिक्रिया दिली.
ऋतुजा लटके यांचं आवाहन : साधारण दहाच्या सुमारास ऋतुजा लटके यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना आपल्या मतदारसंघातील सर्व लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. सोबतच या निवडणूक प्रक्रियेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे देखील आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना केले. लोक योग्यरीत्या मतदान करतील असा विश्वास ऋतुजा व्यक्ती आणि व्यक्त केला.
ठाकरे गट चिंतेत, अनिल परब बूथवर : या पोटनिवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासूनच लोकांचा अतिशय कमी प्रतिसाद पाहायला मिळत होता. साधारण दहा ते बारा या वेळेत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, लोकांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. लोकांच्या या अतिशय कमी प्रतिसादामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा चिंतेत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेचे नेते व त्या विभागाचे विभाग प्रमुख अनिल परब यांनी अंधेरीत येत प्रत्येक बुथला भेट दिली व तिथला आढावा घेतला.
भाजपकडून नोटाचा प्रचार, सेनेच्या कार्यकर्त्या भिडल्या : मुरजी पटेल यांनी भरलेला उमेदवारी अर्ज त्यांना मागे घ्यावा लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी दिसून येत होती. त्याचा परिणाम आज मतदान प्रक्रियेवर देखील पाहायला मिळाला. पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या समर्थकांकडून मतदारांना नोटाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, हा प्रकार काही शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला व त्यांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. त्यामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण होते.
इतके कर्मचारी तैनात : ही मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह साधारणपणे १ हजार ६०० अधिकारी, कर्मचारी, १ हजार १०० एवढ्या संख्येतील मुंबई पोलीस दल व इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित होते. या व्यतिरिक्त ७० सूक्ष्म निरीक्षक देखील कर्तव्यावर होते. या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो हे पाहणं आता महत्त्वाचा आहे. कारण, या निवडणुकीत अपक्षांना जितकं मतदान होईल त्यापेक्षा अधिक मतदान नोटाला होईल अशा चर्चा आहेत. त्यामुळे नेमकं कोणाला किती मतदान होतं हे आता रविवारी मतमोजणी झाल्यानंतरच स्पष्ट होईल.