मुंबई - अभिनेता अर्जुन रामपालची बहिण कोमल रामपाल हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते . मात्र , या चौकशीसाठी आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे कोमल रामपाल हिने तिच्या वकिलांमार्फत एनसीबीला कळवले आहे.
अर्जुन रामपालच्या डॉक्टरांची चौकशी
याआधी दोन वेळा अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. अर्जुन रामपालच्या घरात जी औषधे सापडली होती त्या औषधांच्या संदर्भात अर्जुन रामपालला विचारले तेव्हा ही औषध त्याच्या बहिणीची असल्याचे सांगण्यात आले होते. यासंदर्भातील मुंबई व दिल्लीतील दोन डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन सुद्धा अर्जुन रामपाल याने एनसीबीला दिली आहेत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची तपासणी एनसीबीकडून केली जात असून दिल्लीतील संबंधित डॉक्टरांची चौकशी एनसीबीने केली आहे.
कोण आहे कोमल रामपाल?
अभिनेता अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपाल ही 1994 च्या मिस इंडिया स्पर्धेत फायनलिस्ट स्पर्धकांमध्ये होती व काही वर्षे तिने एअर होस्टेस म्हणून काम केले होते. या सोबतच ती सध्या स्पा सल्लागार म्हणून व्यवसाय करीत आहे.
माझा ड्रग्सशी संबंध नाही अर्जुन रामपालचा दावा
आधी झालेल्या चौकशीत अर्जुन रामपालने अमली पदार्थ तस्करी संदर्भात आपला कुठलाही संबंध नसून एनसीबीला हवी असलेली सर्व कागदपत्रे दिली असल्याचे त्याने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलीवूडमध्ये असलेल्या अमली पदार्थ तस्करी संदर्भात तपास केला जात असताना मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करांना अटक केली जात आहे. या अगोदर झालेल्या चौकशीमध्ये अर्जुन रामपालची प्रियसी गेब्रियल व तिचा भाऊ आगीसिलाओस या दोघांची चौकशी करण्यात आली आहे. नुकतीच आगीसिलाओस याला एका प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्रींची चौकशी
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करत असताना या संदर्भात एनसीबी कडून मोठ्या प्रमाणात चौकशी केली गेली. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती सह इतर बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे.
हेही वाचा - बंद घरात आढळले दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह