मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादीला विचारात न घेता ऊर्जा विभागातील कंपन्यांमध्ये आठ सदस्यांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या नियुक्त्या लवकरच रद्द केल्या जातील, असे संकेत महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज दिले आहेत.
महाविकास आघाडीमध्ये आपण घटक पक्ष असल्याने अशा प्रकारच्या नियुक्त्या करताना इतर पक्षाचे मत विचारात घेणे आवश्यक होते. मात्र, घेण्यात आलेला निर्णयावर फेरविचार करावा लागेल आणि पुढे त्या रद्द करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
थोरात म्हणाले की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अशासकीय नियुक्त्या केल्या. त्याबाबत फेरविचार करावा लागेल, त्या रद्द करण्यात येतील. तसेच साखर उद्योग अडचणींसंदर्भात आज चर्चा होईल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसचे यवतमाळमधील माजी आमदार कीर्ती गांधी, जळगावमधील काँग्रेसच्या पदाधिकारी ज्योत्स्ना विसपुते, पुण्यामधील महावितरणचे माजी कार्यकारी संचालक उत्तम झाल्टे, तर कोल्हापूरचे बॉबी भोसले यांची १५ जुलै; तर बीडमधील काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांचे पती अशोक पाटील आणि रवींद्र दळवी तर नागपूरमधील सचिन आनंद मुकेवार व नितीन मारोतराव कुंबलकर यांची २० जुलै रोजी नियुक्ती केली होती.