मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या काळात अलीकडेच अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती झाली. मात्र त्यानंतरही काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिल्लक राहिल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा आयपीएस अधिकारी आणि राज्य पोलीस सेवेतील दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या आहेत. बिपिनकुमार सिंह यांच्या खांद्यावर आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांना अप्पर महासंचालक पदी नियुक्त करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या तसेच राज्य पोलीस सेवेत दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्ती केल्या आहेत. यामधील नऊ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना नियुक्ती देण्यात आले असून याविषयीचा आदेश गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहेत. बिपिनकुमार सिंह हे देखील नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. मात्र त्यांची आता राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी पौर्णिमा चौगुले श्रींगी या नाशिक शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या, आता त्यांची बदली मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस दलात पोलीस उपायुक्त पदी करण्यात आली आहे.
राहुल खाडे हे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज पहात होते आता त्यांची बदली अमरावती अप्पर पोलीस अधीक्षक जालना येथे करण्यात आली आहे. निवा जैन या नागपूर शहर पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या, त्यांची बदली दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अप्पर निवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तसेच प्रभात कुमार यांची होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे राजकुमार व्हटकर यांची प्रशिक्षण आणि खास पथके या विभागात विशेष महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. एटीएसचे माजी प्रमुख असलेले विनीत अग्रवाल यांना मुंबई म्हाडा विभागात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी अभिजीत शिवतारे यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात सहाय्यक महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे कैसर खालीद यांची मोटर परिवहन विभागात विशेष महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एस एच महावरकर यांची नांदेड येथे विशेष महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जय वसंतराव जाधव यांची राज्य मानवी हक्क आयोगात विशेष महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डी के पाटील-भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभागात विशेष महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.