मुंबई - लॉकडाऊनच्या कालावधीत मालवाहतूक करताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून कामगारांना मारहाण, अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस विभागाशी समनव्य साधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सुनील भारद्वाज (सहआयुक्त (दक्षता), अन्न व औषध प्रशासन) यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. यासंबंधित आदेश त्यांनी आयुक्तांना दिले.
बुधवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात संबंधित विभागाचे आयुक्त, प्रमुख वरिष्ठ अधिकारी, राज्यातील प्रमुख अन्न पदार्थ उत्पादक, बेबीफूड उत्पादक, पॅक फूड उत्पादक आणि वितरक यांची बैठक घेतली. त्यावेळी शिंगणे यांनी हे निर्देश दिले.
हेही वाचा - 'ही' तर सुरुवात, वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल - प्रकाश आंबेडकर
तर उत्पादकांच्या आणि वितरकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून अन्न विभागाचे सहायक आयुक्त मुख्यालय अन्न शैलेश आढाव यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यस्तरावरील नोडल ऑफिसरने आयुक्तांच्या मान्यतेने राज्यभरात इतर नोडल ऑफिसर नियुक्त करावेत. त्यांनी उत्पादक वितरक यांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात. अन्न व्यवसायिकांनी आणि वितरकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री वितरण करताना शासनाने आणि पोलीस यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्वसामान्य जनतेला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच तुटवडा होणार नाही, ते राहत असलेल्या परिसरातील दुकानातून खरेदी करता येईल. काळाबाजार होणार नाही. योग्य किंमतीत अन्न पदार्थ मुबलक प्रमाणात होईल, यासाठी उत्पादक वितरकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री शिंगणे यांनी केले.
हेही वाचा - 'ही' तर सुरुवात, वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल - प्रकाश आंबेडकर
या बैठकीला अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त, अरुण उन्हाळे (भा.प्र.से.), सुनिल भारव्दाज (सहआयुक्त, दक्षता), शैलेश आढाव (सहआयुक्त, मुख्यालय), शशिकांत केकरे (सहआयुक्त, अन्न बृहन्मुंबई विभाग) आणि तसेच पारले पॉडक्ट्स लि. मेरीको इन्डस्ट्रीज, लिबर्टी ऑईल मिल कंपनी, ग्रेन मर्चन्ट कन्झ्युमर प्रोड्युसर संघटना, एवरेस्ट मसाला कंपनी आणि नेसले इंडिया लि. इत्यादि कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.