मुंबई - साकrनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकत दुष्कर्म केल्याचा संतापजनक प्रकार घडला. या दुर्घटनेत महिलेचा आज (शनिवारी) राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात. अशा घटना घडल्यावर आरोपीला शिक्षा होण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या वकिलांची महत्त्वाची भूमिका असते. पीडित महिलांना न्याय देण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांवर सरकारने देखरेख ठेवण्यासाठी मॉनिटरिंग कमिटी नेमावी, अशी मागणी भीम आर्मीच्या मुंबई उपाध्यक्ष योगिनी पगारे यांनी केली. त्या 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होत्या. दरम्यान, याप्रकरणी त्यांनी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने राजावाडी रूग्णालयात जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.
मॉनिटरिंग कमिटीची गरज -
भीम आर्मीच्या योगीनी पगारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर बोलताना अशा घटना घडल्यावर आरोपीला कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार आणि नियुक्त केलेले सरकारी वकील यांची महत्त्वाची भूमिका असते. सरकारी वकीलांची नियुक्ती कशाप्रकारे केली जाते? नेमलेले वकील योग्य प्रकारे बाजू मांडतात का? यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मॉनिटरिंग कमिटी असावी. सरकारी वकिलांनी योग्य प्रकारे बाजू मांडली तरच आरोपीना शिक्षा होऊ शकते, असे पगारे म्हणाल्या. सरकारी वकिलांकडून योग्य प्रकारे बाजू मांडली जात नसल्यानेच खैरलांजी प्रकरणातील आरोपी आज बाहेर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
भाजपाने राजकारण करू नये -
देशात महिलांवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा भाजपा गप्प बसते. करुणा शर्माला अडकवले त्यावेळी भाजपा गप्प होती. दलित महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना भाजपाकडून काहीही केले जात नाही. आज मुंबईत बलात्कार झाल्यावर राजावाडी रुग्णालयात भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ आल्या. इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असताना ते येत नाहीत यामुळे भाजपाने राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या.
फाशीची शिक्षा द्या -
दरम्यान, पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी भीम आर्मीचे मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ गेले असता त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अखेर पोलिसांनी पीडित कुटुंबाची भेट करून दिली. यावेळी 'केंद्र सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद', अशा घोषणा देण्यात आल्या. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भीम आर्मीच्या मुंबई प्रमुख उपाध्यक्ष योगिनी पगारे यांनी यावेळी केली.