मुंबई: मध्य रेल्वेचे करीरोड रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर एका दुचाकीला अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले. एकाच्या नाकातून रक्त येत होते तर दुसऱ्याच्या पायाला मार लागला होता. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही तरुणांनी या जखमी व्यक्तीना तातडीने मदत केली. त्याच्या नाकातून रक्त येत होते. त्या व्यक्तीला या तरुणांनी मान खाली करून नाक एका विशिष्ट प्रकारे धरायला सांगितले. दुसऱ्या व्यक्तीचा पाय तुटला होता. त्याच्या पायाला बाजूलाच असलेल्या बॅनरची काठी काढून पायाला आधार दिला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ॲम्बुलन्सला तसेच पोलीसांना कॉल करून बोलविले. पोलीसांची गाडी पोहचताच या जखमी व्यक्तींना स्ट्रेचरच्या साहाय्याने रुग्णालयात पाठवण्यात आले.
आपदा मित्राचे प्रशिक्षण : रस्त्यावर अपघात झाल्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या दोन व्यक्तींना मदत करणारे तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी होते. रुद्राक्षा होडगरे, आप्पा मनोहर माने, मनिष लाड, विनित जाधव, निखिल परब, अजय लोकरे आणि तन्मय कुसळे अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांनी अडचणीच्या वेळी दोन व्यक्तींना तातडीने मदत पोहोचवली. या विद्यार्थ्यांनी मुंबई महापालिकेकडून देण्यात येणार आपदा मित्र हे प्रशिक्षण घेतले आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीबद्दल महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर व रश्मी लोखंडे तसेच राजेंद्र लोखंडे यांनी कौतुक केले आहे.
आपदा मित्र प्रशिक्षण : महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे जानेवारी २०२३ पासून १२ दिवसांचे आपदा मित्र प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचे धडे प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांसह देण्यात येत आहे. विविध प्रकारच्या आपत्तींनुसार द्यावयाचे प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका आल्यास द्यावयाचा सीपीआर अर्थात कार्डिओ पल्मनरी रीससिटेशन, पूरपरिस्थितीत बचाव व शोध कार्य करणे यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर आगीची घटना घडू नये किंवा विविध स्वरुपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी घ्यावयाची खबरदारी; एखादी दुर्घटना घडल्यास त्यावेळी स्वतःची काळजी घेत करावयाचे मदतकार्य याबाबतही अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रासह ओळखपत्र देखील मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत मुंबईतील सुमारे ५७२ स्वयंसेवकांना आपदा मित्र प्रशिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आले आहे.
हेही वाचा: International Womens Day मुंबई पोलीस दलातील महिलांसाठी खूशखबर मिळणार हे गिफ्ट