मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलीस विभागातील निलंबित अधिकारी सचिन वाझेंना अटक केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान सचिन वाझे याच्या नावावर असलेली आणखी एक गाडी नवी मुंबईतील कामोठे परिसरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने जप्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे याची कसून चौकशी केली जात आहे. त्यातच आता सचिन वाझेंच्या नावावर असलेली आउटलँडर ही कार ही जप्त करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका सोसायटीच्या समोरील रस्त्यावर ही गाडी बेवारसरित्या पडून असल्याचे समोर आले होते. मात्र, याबद्दल स्थानिकांनी कुठलीही तक्रार पोलिसांकडे केली नव्हती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचा क्रमांक आहे MH01 AX 2627 असा असून हिंदुस्थान मोटर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे मॉडेल असलेल्या या गाडीचा चेसीस नंबर MA701CW5WBD001995 असा आहे. ही गाडी 23 जून 2011 रोजी सचिन वाझें याच्या नावावर रजिस्टर करण्यात आली होती.
हेही वाचा - LIVE Updates : अँटिलिया, मनसुख हिरेन हत्याकांड आणि सचिन वाझे प्रकरणाचे ताजे अपडेट्स..