मुंबई Anjali Damania On Bhujbal : महायुती सरकारमधील मंत्री असलेले छगन भुजबळ यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया भुजबळांच्या निवासस्थानी जात असताना जुहू पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. माझ्यासोबत असलेले फर्नांडिस कुटुंब कशासाठी दीड वर्षांपासून लढत आहे, याचा खुलासा करण्याची वेळ आली आहे. जालन्यातील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मी तुमचं खातो काय? मी माझ्या कष्टाचं खातो, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं आपल्या तळपायाची आग मस्तकात गेली. भुजबळांना उठसूठ छातीत कळ यायची ती कळ कुठे गेली. मी माझ्या कष्टाचं खातोय की इतरांच्या कष्टाचं खातोय याचा खुलासा करण्यासाठी आज मी माध्यमांना त्यांच्या घराजवळ फक्त दाखवणार होते. भुजबळ ज्या ठिकाणी राहात आहेत, हे त्यांचं घर नाही तर माझ्यासोबत असलेल्या या परिवाराचं ते घर आहे. त्यांनी ते लुटलेलं असल्याचा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला आहे.
विषय खासदार सुळेंकडेही मांडला : छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना फर्नांडिस कुटुंबातील प्रॉपर्टी मालकांच्या सह्या न घेता डॉक्युमेंट रजिस्टर करण्यात आल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. एक छोटासा बंगला आपण जी एल रहेजा यांना विकसित करण्यासाठी दिला होता. या विषयाची परिस्थिती दीड वर्षांपूर्वी मी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली होती. त्यांनी याविषयी सत्यता पडताळून बघितली. नंतर वाय बी सेंटर इथे जाऊन आमच्या बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीला समीर भुजबळ उपस्थित राहायचे आणि हो-हो म्हणायचे. शेवटी सुप्रिया सुळे यांनी समीर भुजबळ यांना अल्टिमेटम दिल्यानंतर जानेवारी महिन्यात साडे आठ कोटी देतो, असं सांगण्यात आलं. बहुतेक त्यांना कल्पना असेल तेव्हापासून तर आत्तापर्यंत आम्ही फक्त चकरा मारून-मारून, मेसेज करत होतो. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी एक ग्रुप बनविला होता. त्यांनी देखील या तगाद्याबाबत विनंती केली होती. राजकारण बाजूला ठेवून परिवाराला न्याय मिळावा अशा प्रकारची विनंती त्यांनी केली असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
'त्या' कुटुंबाला न्याय द्या : फर्नांडिस कुटुंबाला फक्त न्याय हवाय. आज पर्यंत त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. मे आणि जूनमध्ये ते भाजपा सोबत गेल्यापासून हा विषय पूर्ण बंद झाला आहे. दिवाळीच्या आधी फर्नांडिस कुटुंबाला पैसे द्यायचे आहेत. तर मला मेसेज येतो की ती प्रॉपर्टी ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे मी पैसे देऊ शकत नाही. कारण ही प्रॉपर्टी ह्या कुटुंबाची ओरिजनल प्रॉपर्टी आहे. भुजबळ कुटुंबाने या कुटुंबाला परत एक दमडी देखील दिली नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
48 तासात पैसे खात्यात जमा करा : या प्रकरणाविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना मेसेज पाठवला. सात तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत या कुटुंबाची भेट घडवली या कुटुंबाची दयनीय अवस्था त्यांच्यासमोर मांडली. या कुटुंबातील फर्नांडिस यांच्या मृत्यूनंतर या तिघा मुलांचं काय होणार या चिंतेनं त्या ग्रस्त आहेत. भुजबळ कुटुंब त्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का, असा प्रश्न दमानियांनी उपस्थित केला. काल भुजबळ म्हणाले की, आम्ही कष्टाच्या पैशाचं खातो कोणाचं खात नाही. भुजबळांकडे जो पैसा आहे अशा लोकांचा ओरबडून घेतलेला पैसा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार यांना कळकळीची विनंती आहे की, या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा: