मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. मात्र, दिल्ली सारखी परिस्थिती महाराष्ट्रात होता होता वाचली आहे. दिल्लीसारखाच तबलिगी धार्मिक कार्यक्रम वसई येथे होणार होता. गृह विभागाने वेळीच सतर्कता बाळगून त्यासाठीची परवानगी नाकारल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखता आला आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा- 'हिंदू-मुसलमान' खेळ मांडणाऱ्यांच्या हाती आयते कोलीत!
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.