मुंबई : ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Andheri By Election result ) उद्या घोषित होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके ( rutuja latke ) यांचा विजय निश्चित जवळपास मानला जात असला तरी सुद्धा हा विजय म्हणजे शिवसेनेसाठी फार मोठा नसणार आहे. कारण ही निवडणूक एकतर्फी असताना सुद्धा जेमतेम ३१.७४ टक्के झालेले मतदान व नोटा (कुठलाही उमेदवार पसंतीचा नाही) या बटनाला ऋतुजा लटके यांच्या पाठोपाठ सर्वात जास्त मतदारांनी पसंती दिल्याचे जवळपास नक्की मानले जात आहे.
उद्धव ठाकरे गटासाठी मोठा विजय नाही - कारण या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या शिवाय असलेल्या चार अपक्ष व दोन छोट्या पक्षांच्या उमेदवारांची अमानत रक्कमही जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने ऋतुजा लटके यांचा विजय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी फार काही मोठा विज्योत्सव साजरा करण्यासारखा नाही हे निश्चित मानले जात आहे.
शिवसेनेसाठी चिंतेची बाब - शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले. तर भाजपने मागच्या २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना तिकीट देत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु अखेरच्या क्षणी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण म्हणून निवडणुकीतून त्यांचा अर्ज मागे घेतला व ही निवडणूक एकतर्फी झाली. असे असताना या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय हा निश्चितच मानला जात होता व त्यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण ताकत पणाला लावेल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. या निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात मागील १५ वर्षाच्या तुलनेत सर्वात निच्चांक म्हणजे जेमतेम ३१.७४ टक्के मतदान झाल्याने ही शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे.
शिवसेना बेसावध राहिली - भाजपच्या मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आपला विजय सोप्पा झाला आहे या भ्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शिवसैनिक राहिले. पण मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणे सुद्धा गरजेचे आहे. या गोष्टीकडे त्यांचे दुर्लक्ष राहीले. आदित्य ठाकरे यांचा एखाद दुसरा अपवाद वगळता माजी मंत्री, आमदार नेते अनिल परब सोडले तर इतर कुणी नेते फारसे या मतदार संघात फिरकले नाहीत. ही निवडणूक चुरशीची करण्यासाठी या निवडणुकीत भरघोस मतांनी आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी जी तळमळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुरुवातीला दिसत होती ती नंतर राहिली नाही. त्यात शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने एकनाथ शिंदे याची बाळासाहेबांची शिवसेना या गटाच्या मतदारांनी सुद्धा या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
नोटा राहणार दुसऱ्या क्रमांकावर - या निवडणुकीत फक्त ३१.७४ टक्के मतदान झाल्याने उद्धव ठाकरे शिवसेना गटासाठी हा चिंतेचा विषय आहे. त्यात ऋतुजा लटके यांच्या पाठोपाठ असणारी सहानुभुतीची लाट. त्यात भाजपने आपला तागडीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. समोर असणारे ६ उमेदवारही नवखे होते. याचे कारणासाठी मतदानाची टक्केवारी घसरली. परंतु जर ऋतुजा लटके यांच्या पाठोपाठ सर्वात जास्त मते नोटा (यापैकी एकही उमेदवार पसंत नाही) ला भेटली तर हा सुद्धा नवीन विक्रम होणार आहे.