मुंबई - हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त कांजूरमार्ग येथील दातार कॉलनीतील उद्यानात शिवकालीन शस्त्रांचे, नाणी व शिक्यांचे तसेच गड किल्ल्यांच्या फोटोचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याकाळी वापरलेले शस्त्र, नाणी तसेच गड किल्ल्यांची माहिती इतिहास प्रेमींनी जाणून घेतली. संस्कृती प्रतिष्ठान यांच्यावतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले.
मराठा सैनिकांनी वापरलेले शस्त्र, वापरात असलेली नाणी व शिक्के, गड किल्ले यांची माहिती व्हावी तसेच शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहचावेत यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे संस्थेचे योगेश पेडणेकर यांनी सांगितले. इतिहास अभ्यासक आप्पा परब, शस्त्रसंग्रह संकलक निलेश सकट यांनी प्रदर्शनात आलेल्या नागरिकांना माहिती दिली.
आम्ही दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानमार्फत भव्य गुढी उभारतो. त्याचबरोबर यावर्षी काही तरी वेगळे करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. त्यातून शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. त्याच बरोबर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे देखील प्रदर्शन भरविण्यात आले आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष योगेश पेडणेकर यांनी सांगितली.
शिवकाळात वापरल्या जाणाऱ्या तलवारी, भाले, मराठा धोप, अश्व्कुंज, गजकुंज, फरशी, विटा, जगदापुरी, मुघल तलवार, वाघ नखे, कट्यार अशा विविध प्रकारातील शस्त्रे व विविध लिपीतील नाणी प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध इतिहासकार अप्पा परब यांनी केले. या वेळी परब यांनी गुढी पाडव्याचे महत्त्व आणि शस्त्रप्रदर्शनाबाबत माहिती दिली.