मुंबई - राज्यात सत्तेचा खेळ सुरू आहे. सत्तेसाठी राज्यातील नागरिक आणि मतदारांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निवडणुका घ्याव्यात, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी राज्यपालांना केले आहे.
हेही वाचा - 'फिक्सिंग' झाले तरी सत्यमेव जयतेचाच विजय; 'सामना'तून भाजपवर निशाणा
राज्यात भाजप आणि अजित पवार तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनवत आहेत. हे सर्व सत्तेसाठी चाललेले खेळ आहेत. हा महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे. शिवसेना ही महात्मा गांधी यांना मारणाऱ्या गोडसे यांना पाठिंबा देणारी तर काँग्रेस महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. असे दोन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येणार असतील तर तत्त्वाला तिलांजली देऊन सत्तेसाठी चाललेले राजकारण आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.
अजित पवार यांनी सतत भाजपला विरोध केला. तेच आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले आहेत. हा मोठे पक्ष व नेत्यांनी जनतेचा आणि मतदारांचा केलेला अपमान आहे. हे सर्व महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे ही जनता येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा - दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळांची वापसी; 'महाविकासआघाडी'चे संख्याबळ 163
राज्याला प्रामाणिक सरकार हवे आहे. त्यामुळे राज्यपालांनी पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. जनतेने जो काही तमाशा पाहिला आहे. त्यामधून जनता योग्य असा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.