मुंबई - जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणजे आज जगभरात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येत आहे. तसेच आज वर्ल्ड टॉयलेट डे (जागतिक शौचालय दिन) साजरा केला जातो. या निमित्तानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भन्नाट ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. या टि्वट्च्या माध्यमातून त्यांनी संजय राऊतांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
शिवसेनेवर टीका करण्याची संधी न सोडणार्या अमृता यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी एक सर्वसामान्य स्त्री म्हणून देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना आवाहन केलं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही 'नॉटी' पुरूषांच्या आचार विचारांची घाण 'फ्लश' करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे टि्वट त्यांनी केले.
अमृता फडणवीस यांनी टि्वटमध्ये नॉटी हा शब्द लिहला आहे. या शब्दाचा संजय राऊत यांच्या कंगनाबाबत केलेल्या एका वक्तव्याशी संबध आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्यात वाद पेटला होता. तेव्हा कंगना म्हणजे नॉटी गर्ल असल्याचे ते म्हटले होते. त्याचा खुलासा करताना 'हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन -
जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. 1999 मध्ये पहिला पुरुष दिन साजा करण्यात आला. भारतात त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2007 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला होता. 'पुरुष आणि मुलांचे उत्तम आरोग्य' ही यंदाच्या पुरुष दिनाची थीम आहे.