मुंबई - वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला हाच पती पुढील आयुष्यातही मिळू दे, ही मागणी ऐरवी महिला करत असतात. मात्र, कोरोनामुळे यंदाची वटपौर्णिमा वेगळ्याच पद्धतीने साजरी झाली. यावेळी महिलांनी देशातील कोरोनाचे संकट संपू दे आणि सर्व सुखी राहू दे, अशी मागणी वटवृक्षाकडे केली आहे.
मुंबईत चेंबूर, गोवंडी आणि परिसरात विविध ठिकाणी महिलांनी वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीसाठी सुखी आयुष्याची पार्थना केली. नुकतेच लग्न झालेल्या प्रियंका पाटील यांची ही वटपौर्णिमेची पहिलीच पूजा होती. आपणही आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्याची मागणी करत कोरोनाचे संकट टळू दे, अशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनिता पोळ म्हणाल्या की, आम्ही दरवर्षी याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वडाची पूजा करतो. परंतु, यावेळी कोरोनामुळे महिला बाहेर पडू शकल्या नाही. तरीही आपली परंपरा जपण्यासाठी आम्ही येथे येऊन या वटवृक्षाची पूजा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिता सरवदे म्हणाल्या, वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही वृक्षाची तर पूजा करतो, परंतु आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी मागणी आमची असते. यावेळी कोरोनाचे संकटच संपूर्ण देशावर असल्याने ते संकट दूर होऊन सर्व जनता सुखी व्हावी, अशी मागणी आम्ही आज वटवृक्षाची पूजा करताना केली असल्याचे सरवदे म्हणाल्या.