मुंबई Mumbai Crime News : काही अज्ञात व्यक्तींच्या टोळक्यानं रविवारी (२६ नोव्हेंबर) रात्री एका रुग्णवाहिका चालकाचा खून करून त्याच्या सहकाऱ्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
काय घडलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ड्रायव्हरला गाडीतून ओढलं आणि त्याच्या मानेवर चाकूने वार केला. यात त्याचा मृत्यू झाला. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी चालक युवराज अमरेंद्र सिंह (वय ३० वर्ष) आणि ज्ञानेश्वर नाकाडे (वय २८ वर्ष) हे डीवाय पाटील रुग्णालयात रुग्णवाहिकेतून जात होते. दरम्यान, टोळक्यानं वाहन थांबवून दोघांना बाहेर ओढलं. त्यानंतर एका आरोपीनं युवराज सिंह याच्यावर बांबूच्या काठीनं हल्ला करण्यास सुरुवात केली तर इतरांनी वाहनाचं नुकसान केलं.
गळ्यावर वार केले : या मारहाणीत ज्ञानेश्वर नाकाडे तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला, आणि त्यानं रुग्णालय गाठलं. तेथे त्यानं वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा त्यांना युवराजचा मृतदेह घटनास्थळी पडलेला दिसला. त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. त्यांला तातडीनं रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांचा तपास सुरू : रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या तक्रारीवरून नेरळ पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्यांना संशय आहे की हे रुग्णालयातील काही रुग्णांचे कुटुंबीय असू शकतात. "आमच्याकडे काही लीड्स आहेत. आम्ही लवकरच या प्रकरणात काही जणांना अटक करू", असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा :