मुंबई : औरंगाबादच्या महालगाव येथे आदित्य ठाकरे यांची सभा सुरू असताना एक दगड सभेच्या दिशेने भिरकावण्यात आला. सभा झाल्यानंतर गाडीवर देखील काही दगड भिरकावण्यात आले. यावेळी तेथे असलेल्या लोकांकडून स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या समर्थनात घोषणाबाजी देखील सुरू होती. असा आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाझ करण्यात यावी याबाबतचे एक पत्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनी सेट यांना अंबादास दानवे यांनी दिला आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ समोर येत आहे.
स्टेजवरून खाली उतरून भाषण : परिसरात तणाव झाल्याचे बघताच चंद्रकांत खैरेंनी आपले भाषण आटोपते घेतले. आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहताच त्यांनी स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केले. भाषणाच्या सुरवातीलाच आदित्य ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा, असे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत झालेल्या या चुकीवर अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त करत पुढील दौऱ्यासाठी पोलिसांनी सुरक्षा वाढवावी. तसेच झालेल्या या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबत एक पत्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनी सेट यांना अंबादास दानवे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी : औरंगाबाद येथे आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आदित्य ठाकरे यांची तात्काळ सुरक्षा वाढवली जावी अशी मागणी ही विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षित दुर्लक्ष केले जात आहे. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जात आहे असे गंभीर आरोप राज्य सरकारवर अंबादास दानवे यांनी लावले आहेत.
शिवशक्ती भीमशक्तीत फूट पाडण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे यांची काल महालगाव येथे सभेचे आयोजन होतं. याचवेळी माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक देखील या परिसरात निघाली होती. आदित्य ठाकरे यांचा ताफा आल्यामुळे यात्रा थांबवण्यात आली याचा राग काही लोकांना आला त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या गाडीसमोर येऊन या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना महालगाव येथे घडली. झालेल्या या गोंधळावर अंबादास दानवे यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र जाणून बुजून हा वाद निर्माण केला जातोय. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असल्यामुळेच असा गोंधळ निर्माण करून या युतीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ही अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे.