मुंबई : बिग बॉस 16चा सिझन शनिवारी रात्री संपला. पाच साडेपाच तास रंगलेल्या या फिनालेमध्ये रंगतदार कार्यक्रम पेश केले गेले. कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग यांनी आपल्या विनोदाने सर्वांचे मनोरंजन केले. बिग बॉस १६ चे सर्वच स्पर्धक या अंतिम सोहळ्यासाठी पोहोचले होते. बिग बॉस 16 मध्ये, अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी वाचलेले स्पर्धक म्हणजे प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, अर्चना गौतम, एमसी स्टॅन आणि शालिन भनोट होते. हे सर्व प्रबळ दावेदार असताना, सीझनचे आवडते प्रियंका, एमसी स्टॅन आणि शिव होते. कृष्णा आणि भारती यांनी प्रत्येकाची फिरकी घेत हास्याची कारंजी उडविली. अर्चना, शिव, शालीन, प्रियांका यांनी आपले नृत्यकौशल्य दर्शविले तर एमसी स्टॅन याने रॅप केले. रोहित शेट्टी बिग बॉस 16 च्या घरात खास आणि शेवटचे पाहुणा होते.
स्पर्धक आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत गप्पा : त्यानंतर सलमान खानने कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली. आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत त्याने स्पर्धक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासोबत गप्पा मारल्या. नंतर पाचवरून चार स्पर्धक करण्यासाठी आपसात व्होटिंग केले गेले, ज्यात शालीनला टारगेट केले गेले. परंतु कमी मते मिळाल्यामुळे शालीन घरातून बाहेर पडला. नंतर सलमान खानने चाराचे तीन स्पर्धक करताना व्होटिंगच्या कमतरतेमुळे अर्चना गौतमला बाहेर काढले. अर्चना ओक्साबोक्सी रडत घराबाहेर पडली.
विजेतेपद 'मंडली' पैकी एकाला मिळणार : उरलेले तीन फायनलिस्ट होते प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन. त्यांनंतर वातावरण टेंस झाले होते. कारण तीनपैकी एका स्पर्धकाला बाहेर काढायचे होते. इथे प्रेक्षकांना धक्का बसला, कारण जिचे नाव विजेती म्हणून घेतले जात होते ती, प्रियंका चहर चौधरी एलिमिनेट झाली. उरले होते बिग बॉस १६ च्या 'मंडली' पैकी शिव आणि एमसी. विजेतेपद 'मंडली' पैकी एकाला मिळणार म्हणून 'मंडली' मधील सर्व सदस्य म्हणजेच, साजिद खान, निम्रित कौर, सुंबुल तौफिक आणि अब्दू रोझिक, प्रचंड खुष होते.
बिग बॉस १६ चा विजेता : शेवटी तो क्षण आला. शिव आणि एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारे शेवटचे सदस्य होते. या हंगामात मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अत्यंत सुंदर रीतीने खेळला होता. प्रियांकाचा अडसर दूर झाल्यामुळे तोच विजयी ठरणार अशी सर्वांची धारणा होती. परंतु सलमान खानने एमसी स्टॅनचा हात उचलत त्याला बिग बॉस १६ चा विजेता म्हणून घोषित केले. अल्ताफ तडवी उर्फ एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता होणे हे सर्वांनाच अनपेक्षित होते. मराठमोळ्या शिव ठाकरेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.