मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, शिवसेना-भाजप युती होणार की नाही? याबाबत अजून निर्णय झाला नाही. त्यामुळे युती होणार की नाही? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघेही एकाच मंचावर येत त्यांनी युतीचे संकेत दिले आहेत.
नवी मुंबईतल्या एपीएमसीतील कांदा-बटाटा लिलावगृहात नुकताच माथाडी कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते.
हेही वाचा - ईडीचा पाहूणचार स्विकारण्यासाठी स्वत: जाणार, पवारांनी केले स्पष्ट
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने हा माथाडी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. युती होणार की नाही? याबाबत संभ्रम कायम असतानाच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने अनेकांचे याकडे लक्ष लागले होते. या मेळाव्यात एकाच मंचावर दोघेही एकमेकांशी बोलताना हास्यविनोद करताना दिसून आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून माथाडी कामगारांच्या पाठीशी 'महायुतीचे' सरकार कायम राहील, असे आश्वासन देऊन युतीचे संकेत दिले. माथाडी चळवळीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत, यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. चळवळीतील अडचणी आम्ही दूर करू. माथाडी कामगारांच्या मुलांसाठी सरकार निश्चितच मदत करेल. तसेच, मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा - अन्नसुरक्षेसाठी रासायनिक शेतीला पर्याय नाही; झिरो बजेट शेतीवर आरसीएफचेही प्रश्नचिन्ह
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आगामी निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येणार असल्याचे ठामपणे सांगितले. त्याचबरोबर सध्याच्या पक्षांतरावर भाष्य करताना उद्धव यांनी शिवसेना हा सूडबुद्धीने वागणारा पक्ष नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत वक्तव्य केले.