मुंबई - निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या मुरुड किनाऱ्यावर धडकले असून, त्याचा परिणाम मुंबई किनाऱ्यावर जाणवू लागला आहे. वरळी सी फेसवर समुद्र सकाळच्या तुलनेत अधिक खवळला आहे. जोरदार वादळी वारे वाहत आहेत. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वरळी सी फेसकडे येणारे सर्व मार्ग मुंबई महापालिकेने बंद केले आहेत.
सिलिंक दुपारी 12च्या सुमारास बंद करण्यात आला होता. त्यानंतर वरळी नाक्यावरील आर जी थडानी मार्गही सी फेसकडे जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या जवळ उरणला निसर्ग वादळाचा दुपारी फटका बसू लागल्यानंतर मुंबईतही पावसाचा जोर वाढत असून, 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण मुंबईत मुंबई सेंट्रल, कुलाबा आणि नरिमन पॉईंट परिसरात वृक्ष कोसळून पडले आहेत. दरम्यान, वादळाची तिव्रता कमी झाल्यानंतर सी फेसकडे येणारे मार्ग खुले करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.