राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...
- सिल्लोड (औरंगाबाद) - अंधारी गावातील नदीला अचानक आलेल्या पुरामध्ये एक 28 वर्षीय युवक पडला होता. समाधान वानखेडे असे या युवकाचे नाव आहे. यावेळी नदीच्या प्रवाह वेगात होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत होता. विशेष म्हणजे त्याठिकाणी मोबाईलवरती व्हिडिओ करणारे अनेक जण होते. मात्र, त्या युवकाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. यानंतर गावातीलच नवनाथ तायडे, अक्षय विधवंस या सर्पमित्रांनी नदीत उडी घेऊन त्या युवकाचे प्राण वाचवले.
- करमाळा (सोलापूर) - कोरोनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कॉन्स्टेबल सुनिल गवारी, किरण पवार, संदीप शिंदे यांचा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गृहराज्यमंत्री शंभूराजे शिवाजीराव देसाई यांचे अध्यक्षतेखाली कोरोना अनुषंगाने जिल्हास्तरीय कामकाज आढावा बैठक पार पडली. त्यावेळी हा सत्कार समारंभ पार पडला. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार संजय शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. प्रशासकीय विभागांमध्ये एकजूट ठेवून कोरोनाला हरवण्यासाठी कामकाज सुरू ठेवणेबाबत आवाहन करण्यात आले. तर कोरोनाच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता नाही, असे यावेळी मंत्री शंभूराजे देसाईंनी सांगितले. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी समन्वयाने योग्य नियोजन करा. मृत्यूदर वाढू देऊ नका, रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करा. नवीन आयसीयूच्या १२० बेडचे काम जलदगतीने करा. रुग्णालयातील पदभरती त्वरित करा, यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू घ्या. कोविड सोडून इतर रुग्णांसाठी खाजगी डॉक्टरच्या सेवा घ्या. पीपीए किट आणि औषधांचा पुरवठा सुरळित करण्याचे आदेशही मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.