मुंबई - मागील सात महिन्यांपासून राज्य कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहेत. देशात राज्यात दोन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र, हळूहळू राज्य अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. आता नोव्हेंबरमध्ये अनलॉकचा शेवटचा टप्पा जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच दिवाळीनंतर संपूर्ण राज्य अनलॉक होणार आहे. अगदी शाळा-महाविद्यालये आणि धार्मिक स्थळे सुरू होण्याची शक्यता आहे, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वळता राज्यात लॉकडाऊन लागू झाले. दोन महिने राज्यात कडक लॉकडाऊन होते. मात्र, सर्व व्यवहार अधिक काळ ठप्प ठेवणे अर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मिशन बिगेन अगेन' म्हणत राज्य हळूहळू अनलॉक म्हणजेच एक एक सेवा-क्षेत्र सुरू करण्यास सुरवात केली. बघता-बघता आता अनलॉक 5 लागू झाले आहे. यात हॉटेल-रेस्टॉरंट, बार सुरू झाले आहेत. डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करता येत आहे. लांब पल्याच्या रेल्वे धावू लागल्या आहेत. लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.
अनलॉक-5 पर्यंत शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे वगळता बऱ्यापैकी सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. त्यात आता नोव्हेंबरमध्ये संपुर्ण राज्य अनलॉक होईल, असे संकेत टोपे यांनी दिले आहेत. शुक्रवारी अहमदनगरमध्ये बोलताना त्यांनी दिवाळीनंतर शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तेव्हा आता दिवाळीनंतर नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनाचा कहर सुरूच राहणार असल्याने राज्य अनलॉक झाल्यास नागरिकांना योग्य ती काळजी घेत आपली दैनंदिन व्यवहार करावे लागणार आहेत.
महाराष्ट्र कोरोना परिस्थिती -
राज्यात शनिवारी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली आहे. शनिवारी तब्बल २६ हजार ४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्के इतके झाले आहे. तर यासोबतच राज्यात शनिवारी ११ हजार ४१६ नविन कोरोनाबाधितांचे निदान झाले. तर ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या १५ लाख १७ हजार ४३४ इतकी झाली आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ म्हणजेच २०.५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.