मुंबई - सरासरीच्या जवळ जवळ तिप्पट पाऊस झाल्याने राज्यातल्या सांगली, सातारा कोल्हापूर या भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सर्वप्रथम पूरग्रस्तांना मदत देण्याला प्राधान्य आहे. तसेच उपायोजनासाठी केंद्राकडून मदत मागणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले. पूरस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापुरात सरासरी 124 टक्के, साताऱ्यात 180 तर सांगलीत सरारारीच्या तब्बल 224 टक्के पाऊस झाला असल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे मेहता यांनी सांगितले.
- अन्न, औषध व इतर खर्च करण्याचे अधिकार जिल्ह्यधिकारी यांना देण्यात आले आहेत.
- जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी काढण्याचे आदेशही देण्यात आले.
- ज्या नागरीकांना स्थलांतरीत व्हायचे नाही, त्यांना दहा किलो तांदूळ आणि गहू देण्यास सुरुवात. मेडिकल टीमही कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.
- लेप्टो होऊ नये यासाठी औषध वाटप, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीन टॅबलेट खरेदी करण्यात आले आहे.
- 70 डॉक्टरांच्या टीम पूरग्रस्त भगत तैनात करण्यात आल्या आहेत.
- वाहून गेलेले रस्ते उभारणीसाठी दुरुस्थिसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीच्या सूचना, तसेच बांधकाम साहित्य पुरवण्यात येत आहे.
- पाणी ओसरल्यावर टँकर ने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सोय.
- वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी 32 टीम कोल्हापूर आणि 8 टीम सांगलीला उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला असेल तर नवीन ट्रान्सफर्म तत्काळ बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉस्पिटल्स, शाळा,कॉलेज परिसरात सर्वप्रथम वीज सुरू करण्यात येईल.
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घेण्यात येणार.
कर्नाटक सरकारने मदत केली, त्यामुळे पाणी ओसारण्याला सुरुवात-
जुलैच्या 4 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर कोयना धरण क्षेत्रातही पाऊस वाढला, परिणामी धरणातून विसर्ग करणे आवश्यक झाले होते. तसेच कोयना धरणाचे अभियंते आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे अभियंते संपर्कात होते. अलमट्टी धरणातूनही विसर्ग करण्यात येत होता. मात्र, यासाठी धरण क्षेत्रातील भागाला विसर्गाचा फटका बसू नये यासाठी काही निकष ठरलेले असतात, त्यानुसार काम सुरू होते. महाराष्ट्र सरकारच्या मागणी नुसार अलमट्टी धरणातून अधिक विसर्ग केला जात आहे. आता पर्यंत 4 लाख 80 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीत पाण्याची पातळी कमी होत असल्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले.