मुंबई : Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसवर आपलाच दावा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुढील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अध्यक्षपदावरुन आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळानं कारवाई केल्यानं शरद पवार गट अधिकच आक्रमक झाला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही गटांमध्ये संघर्ष अधिकच वाढणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
द्वेषाचं राजकारण नवीन पिढीला न पटणारं : बारामती अॅग्रो प्लांटवर दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन द्वेष भावनेतून कारवाई केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. द्वेषाचं राजकारण नवीन पिढीला न पटणारं असल्याचंही रोहित पवार यावेळी म्हणाले. आपल्याला वाढदिवसानिमित्त सरकारनं गिफ्ट दिलं आहे. मात्र राज्यातील जनता आणि युवा नक्कीच विरोधकांना रिटर्न गिफ्ट देतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
भाजपाला विरोध केल्यामुळे सूडबुद्धीनं कारवाई : आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. शरद पवार यांची काठी पकडून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील भाजपाला रोहित पवार हे विरोध करत असल्यामुळेच अशा प्रकारची कारवाई केल्याचा आरोप महेश तपासे यांनी भाजपावर केला आहे. शरद पवारांचे विचार सोडून जे लोक भाजपासोबत गेले आहेत, त्यांना ते विरोध करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांच्या पाठीमागं तरुण फळी उभी करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या बारामतीच्या प्लांटवर कारवाई करण्यात आल्याचं महेश तपासे यांनी सांगितलं.
आगामी निवडणुकीत रिटर्न गिफ्ट देऊ : याच कारणानं सूडबुद्धीनं राज्य सरकारच्या एका विभागानं त्यांच्या कंपनीवर कारवाई केल्याचं महेश तपासे यांनी यावेळी सांगितलं. अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईला रोहित पवार घाबरणार नाहीत. रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या अगोदरच्या दिवशी अशा प्रकारचं गिफ्ट जरी दिलेलं असलं, तरी आगामी निवडणुकीच्या माध्यमातून रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं रिटर्न गिफ्ट आम्ही महाराष्ट्रात आणि देशांमध्ये 'इंडिया' आघाडीला निवडून आणून तुम्हाला परत करू असा विश्वासही महेश तपासे यांनी बोलून दाखवला आहे.
हेही वाचा :