मुंबई - आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. शिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले. अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी आज (२२ जुलै) वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आवर्जून स्विकार केला.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या असून वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात या सदिच्छांनी मला नेहमीच बळ दिले आहे. या सदिच्छा कायम माझ्यासोबत असतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानताना राज्यातील जनतेने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू मार्गदर्शक सूचना, आदेश, नियमांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही केले आहे. वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी, तसेच सर्वसामान्य जनतेनेही प्रसारमाध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये लेख, अनुभव लिहून उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर, स्नेह, आपुलकी व्यक्त केली आहे. या सर्वांचे अजित पवार यांनी आभार मानले आहेत.
वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, गरजूंना मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आनंद व्यक्त करुन अजित पवार यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.