मुंबई - राज्यातील आमच्या मजबूत आघाडीबाबत भाजपचे लोक गैरसमज पसरवत आहेत. मात्र, त्यांच्यावर 'ये दीवार टुटती क्यों नही' अशी म्हणण्याची वेळ येईल. आमच्या महाविकास आघाडीची ही दीवार अंबुजा, एसीसी आणि बिर्ला सिमेंटपेक्षाही मजबूत बनून उभी आहे, त्यामुळे ती तुटणार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला लगावला.
सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत अनेक लोक गैरसमज पसरवत आहेत. मात्र, या कायद्यांमुळे राज्यातील जनतेला कुठलाही त्रास होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'मिशन २०२२ मुंबई महापालिका' या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. मुंबईवर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - रक्त सांडून मिळवलेली मुंबई विकून जाऊ नका'
शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. परंतु भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी आम्ही राज्यात एकत्र आलो आहोत आणि पुढेही एकत्र राहूनच काम करणार आहोत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत समविचारी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असेही निर्देश त्यांनी दिले.
हेही वाचा - दिल्लीतील हिंसाचारादरम्यान शीख पिता-पुत्रांनी वाचवले ७० मुस्लिमांचे प्राण
'शिवसेना हा मुंबईत नंबर एकचा पक्ष आहे. तो राहिला पाहिजे आणि आपण मात्र दुसऱ्या स्थानावर आलो पाहिजे. यासाठी बूथ स्तरावर जाऊन काम करण्याची गरज आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे यापुढे दहा आमदार आणि किमान ५० ते ६० नगरसेवक तरी आले पाहिजे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. आपल्या पक्षाकडे गृहनिर्माण, अल्पसंख्यांक आणि वित्त खाते आहे. त्याचा मुंबईच्या विकासासाठी फायदा करून घेता येणार आहे. मात्र हे करताना कोणाचीही फसवणूक होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.