मुंबई - देशाच्या हितासाठी आम्ही काही पक्षांना महाआघाडीत सामावून घेऊ इच्छित होता. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र, तथ्यहीन कारणे देऊन आघाडी होऊ नये, यासाठी भाजपची बी-टीम कार्यरत होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता लगावला. ते आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी केली होती. आम्ही मित्र पक्षांना १० जागा देणार होतो. त्यात आम्ही वंचित बहुजन आघाडीला ४ जागा देण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना आघाडीत यायचे नव्हते. त्यामुळे ते चर्चेचा केवळ बागुलबुआ उभा करून चर्चा फिस्कटत होते, असा आरोपही अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांवर नाव न घेता केला .