मुंबई - राज्याच्या हिताचा मराठवाडा ग्रीड प्रकल्प नव्या सरकारने थांबवलेला नाही. परंतू, आर्थिक व्यवहार्यता पाहून यासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांशी पुन्हा एकदा चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या संदर्भाचा तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अजित पवार बोलत होते.
सर्व धरणे एकाच वेळी भरत नाहीत. मराठवाडा ग्रीड योजनेचे टप्पे पाडण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारने नदीजोड प्रकल्पाचा विचार करावा असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निर्देश दिले. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्राच्या नद्या उत्तरेतल्या नद्याप्रमाणे बारमाही नाहीत. त्यामुळे नदीजोड प्रकल्प कितपत व्यवहार्य ठरेल याबाबत शंका आहेत. कायमस्वरूपी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वकष अशी बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील असेही अजित पवार म्हणाले.