मुंबई Airline Tickets Expensive : चार दिवसांचं हे महापर्व उत्तर भारतीयांसाठी फार मोठं असतं. पती आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तसंच घरात सुख समृद्धी नांदावी निरोगी जीवनासाठी महिला हे व्रत करतात. (Tripling in Flight Tickets) यामध्ये सूर्य देवाची उपासना केली जाते. विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये जाऊन हे व्रत करायला उत्तर भारतीय जास्त प्रमाणामध्ये प्राधान्य देतात; परंतु रेल्वेचं तिकीट मिळत नाही आणि दुसरीकडे हवाई प्रवासाचा दर परवडत नाही. अशा विवंचनेत उत्तर भारतीय सापडले आहेत.
दलालांचा सुळसुळाट नेहमीचाच : छठ पूजेसाठी मुंबईहून यूपी आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांमध्ये तिकीट उपलब्ध नाही. तत्काळ तिकिटांसाठी दररोज काउंटरवर मोठी गर्दी होत असते. आता दलालांनीसुद्धा किमती वाढवल्या आहेत. ट्रेनमध्ये तिकीट उपलब्ध नसल्यानं कोणी हवाई प्रवास करायचं ठरवलं तर तेसुद्धा शक्य नाही. या पाच दिवसात मुंबईतून दरभंगा आणि गोरखपूर येथील हवाई तिकिटांच्या किमती या दुबई, काठमांडू आणि कोलंबो येथील हवाई तिकिटांपेक्षा महागल्या आहेत. छठपूजेचं पर्व असल्या कारणानं तिकिटांच्या दरात दोन ते तीन पटीनं वाढ झाली आहे.
रोजंदार प्रवाशांसाठी हवाई तिकीट अशक्य : याविषयी बोलताना पाटणा येथे राहणारे 55 वर्षीय उमाकांत मिश्रा म्हणतात की, ते मागील चार दिवसांपासून दररोज पहाटे रांग लावतात; परंतु अद्याप त्यांचा नंबर लागला नाही. आरक्षण तिकिटाजवळ मोठ्या प्रमाणामध्ये दलालांचा सुळसुळाट असतो. दलाल आणि रेल्वेतील अधिकारी यांच्या संगनमतानं तिकिटांचा काळाबाजार होत आहे. तर बिहार मधील ५० वर्षीय प्रजापती सांगतात की, बऱ्याच दिवसांपासून तिकिटांसाठी प्रयत्न करतोय. पण, रेल्वेचं तिकीट मिळत नाही. आमच्यासारख्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी हवाई प्रवासाची कल्पनाच आम्ही करू शकत नाही. विशेष म्हणजे, उत्तर भारतात छटपूजेसाठी आठवड्यातून एकदा सोडणारी विशेष गाडी ही रोज सोडायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्पेशल ट्रेनचे भाडे आवाक्या बाहेर : रेल्वेकडून सुविधा स्पेशल ट्रेनच्या नावाखाली डायनॅमिक भाडं आकारलं जात आहे. १७ नोव्हेंबर रोजी सुविधा एक्स्प्रेस सीएसएमटी ते पाटणा जंक्शनपर्यंत चालवली जात आहे. डायनॅमिक भाड्यामुळे या ट्रेनच्या स्लीपर सीटचे भाडे २,६२५ रुपये, थर्ड इकॉनॉमीसाठी ६,३३५ रुपये, थर्ड एसीचे ६६५५ रुपये आणि सेकंड एसीचे भाडे ९,३९५ रुपये झालं आहे; परंतु १७ नोव्हेंबरसाठी या गाडीच्या कुठल्याही श्रेणीचं तिकिट उपलब्ध नाही. याविषयी बोलताना, मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख सांगतात की, रेल्वेनं ज्या काही विशेष गाड्या सोडल्या आहेत त्याचं भाडं हे सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यावर रेल्वेनं विचार करायला हवा. नेहमीच्या रेल्वे गाड्या, विशेष रेल्वे गाड्या, हवाई प्रवास सर्वांचेच भाव वाढवले आहेत. अशा परिस्थितीत, जर एखाद्याला प्रवास करायचा असेल तर सर्वच प्रवास महाग झाल्यानं गावी जावं तरी कसं? हा प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडला आहे. दिनांक आणि शहरानुसार हवाई प्रवासाचे भाडे खालीलप्रमाणे आहेत.
१७ नोव्हेंबर
पटना - १६.७ हजार
काठमांडू - ७.३ हजार
दरभंगा - १८.९ हजार
दुबई - ११.३ हजार
गोरखपुर - १४.७ हजार
कोलंबो - ११.८ हजार
१८ नोव्हेंबर
पाटना - १५ हजार
काठमांडू - ७.३ हजार
दरभंगा - १५.८ हजार
दुबई - १२.६ हजार
गोरखपूर - ११.८ हजार
कोलंबो - १०.१ हजार
19 नोव्हेंबर
पाटना - ९.४ हजार
काठमांडू - ७.३ हजार
दरभंगा - १२.२ हजार
दुबई - १०.९ हजार
गोरखपूर - ९.६ हजार
कोलंबो - ९.५ हजार
20 नोव्हेंबर
पाटना - ८.७ हजार
काठमांडू - ७.३ हजार
दरभंगा - ८.८ हजार
दुबई - १२.६ हजार
गोरखपूर - १०.३ हजार
कोलंबो - ९.५ हजार
हेही वाचा:
- Chhat Pooja in mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची छटपूजेला उपस्थिती, आज मुंबईमध्ये 81 ठिकाणी छटपूजा साजरी...
- Chhath Puja : छठ पूजेवरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले; मैदान देण्याचे आदेश
- छठ पूजेसाठी गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी, छटपूजेसाठी महापालिकेकडून कृत्रिम तलावाची निर्मिती