मुंबई - राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांवर दोघांत चर्चा झाली. तसेच राज्यात उशीरा दाखल होणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांचे आणखी नवे प्रश्न निर्माण झाले आहेत, यावरही चर्चा करण्यात आली.
पीक विमा संदर्भात काही कंपन्या शेतकऱ्यांना विमा देताना टाळाटाळ करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, पण ती नावे आता अधिवेशन असल्यामुळे जाहीर करणार नाही, असे बोंडे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेना पक्षाकडूनही चारा छावणीत राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना सुरू करण्यात आली आहे. आता लांबलेल्या मान्सूनमुळे जे नवे प्रश्न निर्माण झालेत त्यावर चर्चा झाली. मान्सून लांबल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे सुरु करण्यास विलंब होत आहे.