मुंबई Agniveer Suicide News : अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार घटनेच्यावेळी, मृत तरुणी ही आयएनएस हमला येथे अग्निवीरसाठीचं प्रशिक्षण घेत होती. मालवणी पोलिसांनी तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.
मुंबईत नौदलात अग्निवीरसाठीचं प्रशिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीनं आज (28 नोव्हेंबर) मालाड परिसरातील मालवणी येथे आत्महत्या केल्याचं आज सकाळी उघडकीस आलंय. मालवणी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं.
प्रेमसंबंधातून आत्महत्या? : अपर्णा नायर असं मृत तरुणीचं नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसंच या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, अपर्णा नायर ही तरुणी आयएनएस हमलावर येथे प्रशिक्षणासाठी आली असताना ही घटना घडली. तसंच प्रशिक्षणार्थी तरुणीनं केलेल्या आत्महत्येमुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे, असंही ते म्हणाले.
अग्निवीरसाठी प्रशिक्षण घेण्याकरीता आलेली मुलगी ही मूळची केरळची असून पंधरा दिवसांपूर्वी ती आयएनएस हमलावर नौदलाच्या प्रशिक्षणासाठी आली होती - चिमाजी आढाव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे
पुढील तपास सुरू : सदरील घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. नौदलाच्या डॉक्टरांनी प्रशिक्षणार्थी तरुणीची तपासणी करून तिला मृत घोषित केलं. दरम्यान, याप्रकरणी मालवणी पोलीस पुढील तपास करत आहेत. तसंच मालवणी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -