मुंबई - कडकनाथ कोंबडी प्रकरणात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तक्रार करून देखील शेतकऱ्यांचे अडकलेले लाखो रुपये मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सरकारकडे यासंदर्भात वेळोवेळी न्याय मागितला तरी देखील शेतकऱ्यांना याबाबत ठोस आश्वासन मिळालेले नाही.
हेही वाचा - 'गरज पडल्यास सेना-राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोबत घेऊ'
वाढती महागाई, अवकाळी पाऊस यामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायातून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी शुक्रवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनाचे आमिष दाखवत हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्यात फसवणूक झालेले शेतकरी कोंबड्या वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खाद्य नसल्यामुळे आणि त्यांच्या पोषणासाठी पैसे नसल्यामुळे कोंबड्या मरत आहेत. मात्र, शासनाकडून आणि मागील सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही.
हेही वाचा - पुण्यातील गहुंजे बलात्कार प्रकरण : राज्य महिला आयोग सर्वोच्च न्यायालयात
कडकनाथ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एमपीआयडी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना जेवढे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई त्वरित मिळावी, यासाठी शेतकरी कडकनाथ कोंबड्या घेऊन आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. नवीन सरकारकडून नक्कीच आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
काय आहे कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचा घोटाळा?
कडकनाथ कोंबडी पालन करण्याचा व्यवसाय गेल्या २ वर्षांपूर्वी सुरू झाला. यामध्ये अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्रत्येक ठिकाणी मोठी जाहिरातबाजी केली. कमी पैशात दुप्पट उत्पन्न देणारा व्यवसाय कुक्कुटपालन आहे. सुरुवातीच्या काळात अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काही शेतकऱ्यांना तिप्पट-चौपट रक्कम दिली. त्यानुसार हजारो शेतकऱ्यांनी कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात पैसे गुंतविले आणि व्यवसाय सुरू केला.
यामध्ये कंपनीकडून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनीला आधी पैसे द्यावे लागतात. त्यानंतर कंपनी कडकनाथ कोंबड्या शेतकऱ्यांना द्यायची. त्यानंतर कोंबड्या मोठ्या झाल्यानंतर त्यांची अंडी आणि कोंबड्या यांचा दाम दुप्पट देऊ, असे सांगण्यात आले. मात्र, काही काळानंतर कंपनी बंद पडली. यामध्ये शेतकऱ्यांनी करोडो रुपये गुंतविले आहेत. कडकनाथ कोंबड्यांची पिल्ले शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे खाद्याविना मरत आहेत. काहींनी आपली शेती विकून, खासगी सावकारांचे, बँकांचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. मात्र ,कंपनीचा फायदा होताच कंपनी बंद करून पळून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा घोटाळा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाला आहे. त्यामुळे त्यांच्या काळात सत्तेत सहभागी असलेले सदाभाऊ खोत आणि त्यांचा मुलगा सागर खोत यांचा या कंपनीशी संबंध आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन सरकारने कारवाई केली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे देखील नोंदवलेले नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच या घोटाळ्यातील आरोपी जे शेतकऱ्यांना या व्यवसायात आणत होते त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे या नवीन सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या समजल्या जातील. करोडो रुपयांच्या घोटाळ्यामध्ये हजारो शेतकरी अडकलेले आहेत. त्यांना न्याय मिळवून देईल. दोषींवर कारवाई केली जाईल आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींची संपत्ती विकून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जातील, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. त्यामुळे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले आहे.