मुंबई - कोरोनानंतरच्या काळात मोठ्या, धाडसी, जलद आणि चौकटीबाहेरच्या निर्णयांची अधिक गरज भासणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते बोलत होते. या चर्चेत विविध बँकांचे अधिकारी आणि अभ्यासक होते. कोरोनानंतरच्या काळातील परिस्थिती आणि उपाय, अन्य राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था, स्टार्टअप, आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक, शासन स्तरावर डिजिटल पद्धतींचा अधिकाधिक वापर, उर्जा क्षेत्र, जीवनमानाच्या समस्या अशा अनेक विषयांवर ही चर्चा आधारित होती.
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला, केपीएमजीचे संतोष कामथ, प्रदीप उधास, सीए प्रकाश पाठक, श्रीराम देशपांडे, मुकुंद चितळे, अतुल निशार, कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंटचे निलेश शाह, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आशीष चौहाण, विनायक गोविलकर हे सहभागी झाले होते.
कोविडनंतरच्या काळात स्टार्टअपला व्यापक संधी राहतील, याबाबत काहीही शंका नाही. महाराष्ट्र हे देशाचे इंटस्ट्रीयल हब आहे आणि भारतासाठी एक मोठे शक्तिकेंद्र आहे. त्यामुळे पुढच्या कालखंडात अधिक मुक्तपणे विचार करावा लागणार आहे. येणार्या काळात धाडसी, मोठ्या, जलद आणि चौकटीबाहेरच्या निर्णयांची गरज असणार आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले. शेतीसाठी व्हॅल्यूचेन, लघु आणि मध्यम उद्योगांना सहाय्य, पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग इत्यादी विषयांवर सुद्धा यावेळी चर्चा झाली.