मुंबई - रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारली आणि कळंबोली ते वायझॅग (विशाखापट्टणम) आणि वायझॅग ते नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वीरीत्या चालविली. द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन टँकरच्या वाहतूकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वेद्वारा विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या पथकाने कळंबोली येथे फक्त 24 तासांत रॅम्प बनविण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे.
दूरच्या मार्गाची निवड
रो-रो सेवेच्या वाहतूकीसाठी रेल्वेला घाट रस्ता, रोड ओव्हर ब्रिज, बोगदे, वक्र मार्ग, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, ओव्हर हेड इक्विपमेंट इत्यादी ठिकाणांच्या बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा बनवायचा होता. कारण उंची ही यातील महत्त्वाची बाब असल्याने रेल्वेने वसईमार्गे वाहतूकीचा नकाशा तयार केला. उंची 3 हजार 320 मिमी असलेले रोड टँकर टी 1618 चे मॉडेल सपाट वॅगन्सवर ठेवणे शक्य असल्याचे आढळले. मुंबई विभागातील घाट विभागात ओव्हर डायमेंशनल कार्गो (ओडीसी) चालविण्याची परवानगी नसल्यामुळे वसईमार्गे जाणाऱ्या दूरच्या मार्गाची निवड करण्यात आली होती.
7 टँकर 10 तासात लोड
कळंबोली ते वायझॅगमधील अंतर 1 हजार 850 किलोमीटरहून अधिक आहे. जे या रेल्वेने साधारणतः 50 तासात पूर्ण केले. 100 टनांपेक्षा जास्त एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असलेले 7 टँकर 10 तासात लोड केले गेले. केवळ 21 तासांत नागपुरात परत आणले गेले. काल (दि. 23 एप्रिल) नागपुरात रेल्वेने 3 टँकर उतरवले आहेत. उर्वरित 4 टँकर केवळ 12 तासांत नागपूरहून आज (दि. 24 एप्रिल) सकाळी 10.25 वाजता नाशिकला पोहोचले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू
लांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस 2 दिवस तर रस्त्यामार्गे 3 दिवस लागतात. या टँकरच्या वेगवान वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केले गेले होते आणि हालचालींचे निरीक्षण सर्वोच्च पातळीवर केले गेले होते. कारण, आम्हाला माहित आहे की आपल्या राष्ट्रासाठी हा कठीण काळ आहे आणि राष्ट्र आमच्यासाठी सर्वस्व आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली होती. आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली, अशी प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत'ला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
हेही वाचा - विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांना राज्यपालांचा हिरवा कंदील