मुंबई - राज्यभरात लांबलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओला दुष्काळसदृष्य परीस्थिती निर्माण झाली आहे. या भागांची पाहणी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत.
कोकणात मुसळधार पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कापणीच्यावेळी पावसाच्या तडाख्याने हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याच काही भागांचा आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत.
दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी ते प्रशासनाकडे मागणी करणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा दौरा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कुवे या गावापासून सुरू होणार असून याच दिवशी राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांचाही ते दौरा करणार आहेत.
नुकतेच कोकणात 'क्योर' चक्रीवादळाने समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांचंही मोठं नुकसान केलं आहे. यासंदर्भात मागण्या मांडण्यासाठी वेंगुर्ले येथील उभादांडा किनाऱ्यावरील मच्छिमार बांधव आदित्य ठाकरे यांना भेटणार आहेत.