मुंबई : बारसू येथे खोके सरकारची दडपशाही सुरू असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री गायब आहेत, अशी घणाघाती टीका युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. पोलिसांचा सुरू असलेला अत्याचार, सर्वेक्षण थांबवा आणि स्थानिकांशी संवाद साधा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आंदोलकांची ठाम भूमिका : राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. स्थानिकांचा या सर्वेक्षणाला कडाडून विरोध आहे. आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांसह तरुण वर्ग, महिला आणि मुलेही सहभागी झाली आहेत. या पार्श्वभूमीवर रिफायरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणापूर्वी पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. मात्र ग्रामस्थांकडून तरीही आंदोलन केले जात आहे. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करत अत्याचार केला जात आहे. गोळ्या झाडा किंवा खून करा, मात्र आम्ही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांकडून स्थानिकांवर पोलिसी बळाचा वापर केला जातो आहे.
'वाद वाढवण्यापेक्षा जाहीर संवाद साधावा' : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पाठोपाठ विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील बारसू येथील आंदोलनावर भाष्य केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, बारसू येथे सुरु असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे. पहिल्यांदा हा अत्याचार, सर्वेक्षण थांबवा आणि स्थानिकांशी संवाद साधा. फायदा कुणाचा होणार आहे हे पटवून सांगा. वाद वाढवण्यापेक्षा जाहीर संवाद साधावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. कोकणात प्रकल्प व्हावा, अशी महाविकास आघाडीची देखील अट होती. कोणता प्रकल्प असेल, हे जनतेला समजावून सांगावे. तसेच एक जाहीर सादरीकरण करावे. प्रकल्पात पारदर्शकता ठेवावी आणि अंतिम मान्यता भूमिपुत्रांची घ्यावी, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.