मुंबई - मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंनी कफ परेड रहिवाशांशी कुलाबा येथील विवांता हॉटेलमध्ये संवाद साधला. यावेळी आमदार राज पुरोहित आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यावेळी संवाद साधताना म्हणाले, मतभेद असूनही शिवसेना सदैव भाजपसोबत राहिली. देशहितासाठी भाजपसोबत युती केली आहे. विरोधकांकडे नेते नाहीत. स्थानिक प्रश्न सोडवू, राष्ट्रीय निवडणुकीसाठी भाजप- सेनेला साथ द्या, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी रहिवाशांनी महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगितले. खासगी-सरकारी सहकार्यातून शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची कुलाबा रहिवाशांनी आदित्य ठाकरेंकडे मागणी केली. शिक्षणासाठी ३ हजार कोटी खर्चून ३०० कोटींचे उत्पन्न मिळते. शाळांच्या सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
यावेळी रहिवाशांनी कोस्टल रोड कफ परेड वाढविण्याची मागणी केली. अभ्यास करुन निर्णय घेऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दक्षिण मुंबईतील लीज संपले आहेत, नोटीफिकेशनसाठी मुख्यंमत्र्यांना भेटणार आहे असे त्यांनी सांगितले. पाणी कपातीने अडचण आहे. टँकरवर अवलंबून रहावे लागते. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे रहिवाशांनी सांगितले.
विधानसभेसाठी भाजप-सेना पुन्हा एकत्र लढणार आहे. अरविंद सावंत निवडून आले तर त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रयत्न करु. मुंबईतील विकासकामे केंद्र, राज्यसरकार आणि मुंबई मनपाच्या एकत्रित प्रयत्नांनी पुढे जात आहेत, असे ठाकरे म्हणाले.
खासदार अरविंद सावंत म्हणाले, मी संसदेत सर्वाधिक सहभाग घेतला. मुंबईकरांना पाण्यासाठी धरण बांधले. महानगरपालिकेने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. जीएसटी मंजूर करताना कायद्यात दुरुस्ती करुन घेतली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रह धरला. सुटी घेऊन मतदान टाळू नका. मतदान करुनच फिरायला जा असे ते म्हणाले.