मुंबई - वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वरळीतील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आदित्य यांना एक ते सव्वा लाख मते मिळतील असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. मात्र, या मतदार संघात एकूण 1 लाख 29 हजार मतदारांनी मतदान केल्याने सेनेचा हा दावा फोल ठरणार आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. सुरेश माने तर वंचित बहुजन आघाडीकडून गौतम गायकवाड निवडणूक लढवत आहेत. वरळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. वरळीमध्ये 2014 च्या निवडणुकित 55.57 टक्के मतदान झाले होते, तर यावर्षी 50.20 टक्के मतदान झाले आहे.
मागील निवडणुकीपेक्षा यावेळी साडेपाच टक्के मतदान कमी झाले आहे. 2014 ला 55.57 टक्के मतदान झाले होते. 2 लाख 65 हजार 91 मतदारांपैकी 1 लाख 46 हजार 653 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामधील 60 हजार 625 मतं सुनील शिंदे यांना तर 37 हजार 613 मत सचिन अहिर यांना मिळाली होती.
हेही वाचा - 2014 ला राज्यात होती 'अशी' स्थिती; यंदाही आघाडीला धक्का देत युती सुसाट?
याच मतदार संघातील विरोधी पक्षात असलेले माजी आमदार व मंत्री सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने आदित्य ठाकरे यांना एक लाख ते सव्वालाख मतं मिळतील असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. मात्र, हा मतदार संघात आंबेडकरी चळवळीचाही बोलबाला आहे. आंबेडकरी समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. सुरेश माने यांना तर वंचित बहुजन आघाडीने गौतम गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आंबेडकरी समाजाची मते या दोघांना मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शिवसेनेला मिळणारी मतं कमी होतील. परिणामी आदित्य ठाकरे यांना एक ते सव्वालाख मतं मिळण्याचा दावा फोल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.