मुंबई - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्र, अन्न वितरण केंद्र आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना आणि सुविधांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश पालिकेच्या शहर विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.
मुंबई महापालिकेच्या परिमंडळ १ मधील ए, बी, सी, डी, ई या विभाग कार्यालयाअंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा संजीव जयस्वाल यांनी घेतला. या उपाययोजनाचा नेमका नागरिकांना आणि रुग्णांना फायदा होत आहे का? त्यात आणखी कोणत्या सुधारणा करण्याची गरज आहे? याची पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, नितीन आर्ते, चक्रपाणी अल्ले, प्रशांत गायकवाड, मकरंद दगडखैरे हे विभाग अधिकारी उपस्थित होते.
जयस्वाल यांनी ई विभाग कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भायखळा परिसरात ताडवाडी प्रतिबंधित क्षेत्र, रिचर्डसन क्रूडास येथील कोरोना काळजी केंद्र (सीसीसी २) तसेच कम्युनिटी किचन, बी विभाग हद्दीतील हॉटेल बिस्मिल्ला तसेच नजम बाग येथील कोरोना काळजी केंद्र (सीसीसी १) या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांची पाहणी केली. त्यानंतर ग्रँट वैद्यकीय जिमखाना व चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदीक रुग्णालयामध्येही सीसीसी २ व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी जयस्वाल यांनी भेट दिली. डी विभागाच्या हद्दीतील एमपी मिल कम्पाऊंड येथे एसआरए इमारतीतील सीसीसी २ सुविधा, आदर्श पॅलेस हॉटेलमधील सीसीसी १ व्यवस्था, ए विभागातील सुंदर नगर आणि सुखदवाला येथे सीसीसी २ सेवेसह ए विभागामध्ये अन्न वितरणासाठी सुरू असलेल्या फूड किचनची व्यवस्था जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहिली.
या क्षेत्रीय भेटीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा योग्यरित्या होतो आहे किंवा नाही याबाबत विचारपूस केली. कोरोना केंद्रांमध्ये राहत असलेल्या व्यक्तिंच्या भेटी घेऊन त्यांना कोणकोणत्या बाबींमध्ये आणखी सुधारणा अपेक्षित आहेत, सध्या देण्यात असलेल्या सुविधांमध्ये समाधान वाटते किंवा नाही, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. कम्युनिटी किचनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, किचनमधून पुरवले जाणाऱ्या अन्नाचा दर्जा यांचेही जयस्वाल यांनी निरीक्षण करून आवश्यक तेथे सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले.