मुंबई - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला सर्व पालख्या एसटी बसने नेण्यात आल्या. मात्र, त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीकडून भाडे आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भाडे आकारणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई व याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच पालख्या एसटीतून पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. याबाबतचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे आदेश स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तरीही निवृत्ती महाराजांच्या पालखीकडून बस भाडे आकारण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच अनिल परब यांनी खेद व्यक्त केला आहे. संबंधित वारकऱ्यांचे पैसे परत दिले जातील, असे परब म्हणाले.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाऊलींच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे 71 हजार रुपये भाडे आकारण्यात आले. त्यामुळे नेहमी पायी विनाशुल्क वारी करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती.