ठाणे- राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्रदीपक विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावावरून जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजपा), एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना आणि अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या तीन पक्षांमधीलच कोणीतरी एक मुख्यमंत्री होणार हे उघड आहे. मात्र, सध्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार चढाओढ असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अनेक ठिकाणी पूजा अर्चा केली जातेय.
लाडक्या बहिणींची पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे साद : विशेष म्हणजे राज्यभरात विविध ठिकाणी लाडक्या बहिणी आणि नागरिकांनी एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पूजा अर्चा केलीय. खरं तर मुख्यमंत्रिपदाचा तिढा काही सुटत नसतानाच आता ठाण्यातल्या लाडक्या बहिणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चक्क पत्र लिहून मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांना बसण्याचा मान देण्याची विनंती केलीय. राज्यात महायुतीचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला पाहायला मिळतोय. राज्यात महायुतीचं सरकार असावं, पण मुख्यमंत्री हे पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच असावं, अशी भावना लाडक्या बहिणींनी व्यक्त केलीय. ठाण्यातील लाडक्या बहिणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे साद घातलीय.
महायुतीचा चेहरा एकनाथ शिंदे : विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे, त्यामुळे राज्यातील अनेक प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी देण्यात यावी, तसेच सरकार व्यवस्थित पद्धतीनं चालवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री करावे, असं पत्रात म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी : महायुतीला मिळालेल्या यशानंतर ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांचे पोस्टर लागले असून, त्यावर एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांना मुख्यमंत्रिपदावर बसण्याचं आवाहनदेखील केलंय. या पोस्टरबाजी सर्व धर्मीय कार्यकर्त्यांचा सहभाग असून, अनेक महिलांनी एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केलीय.
हेही वाचा :