मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पालिकाआज गुन्हा दाखल करणार आहे.
पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई यांना पालिकेच्या पॅनलवरून काढून काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पालिकेकडून शुक्रवारी पाच अभियंत्यांना दोषी ठरवत २ अभियत्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ए. आर. पाटील आणि एस. एफ. काकुळते असे शुक्रवारी निलंबित करण्यात आलेल्या अभियत्यांची नावे आहेत. शिवाय, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान या शुक्रवारी पुलाचा लोखंडी सांगाडा पाडण्यात आला.