मुंबई : मुंबईत सध्या सुमारे ५ हजारपेक्षा अधिक ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. तिथून धूळ निर्माण होत असल्याने प्रदूषण वाढते आहे. या धुळीचा अटकाव करणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे या विविध बांधकामे आणि विकास कामांच्या ठिकाणाहून निर्माण होणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी सर्व संबंधित भागधारकांना त्याविषयी सूचना देऊन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. याच्या पद्धती आणि उपाययोजना, नियम व सूचना यांचे उल्लंघन केल्यास करावयाची कठोर कारवाई या तीन पैलूंवर सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नामनिर्देशित सदस्य : जी समीती स्थापन केली आहे त्या समितीमध्ये सदस्य म्हणून पर्यावरण विभागाचे उपआयुक्त, पायाभूत सुविधा विभागचे उपआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त, विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता सतीश गीते आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नामनिर्देशित सदस्य अशा सहा जणांचा या समितीमध्ये समावेश केला करण्यात आला आहे.
तर बांधकाम थांबवण्याची होणार कारवाई : पालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धूळ नियंत्रणाची अंतिम कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. ही कार्यपद्धती १ एप्रिल २०२३ पासून लागू केली जाईल. या कार्यपद्धतीचे अथवा कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांना सूचना देऊन काम थांबवणे व इतर कठोर कारवाई देखील केली जाईल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
जी २० साठी पुन्हा रस्ते चकाचक : जी २० परिषदेचे मुंबईत पुन्हा आयोजन करण्यात आले असून २८ ते ३० मार्च या कालावधीत परिषद होणार आहे. जी २० परिषदेसाठी देशविदेशातील पाहुणे येणार आहेत. या दोन दिवसीय परिषदे पूर्वी मुंबईतील रस्ते पुन्हा एकदा चकाचक आणि सुशोभित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बैठकीची बहुतांश ठिकाणे आणि अभ्यागतांची निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स कायम आहेत. त्यामुळे सर्व संबंधित मार्गांवर रस्ते देखभाल आणि इतर आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत, अभ्यागतांसाठी वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेची उपलब्धता राहील याची काळजी घ्यावी आदी सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. या सर्व कामांची पाहणी आणि रंगीत तालीम २५ मार्च रोजी घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
हेही वाचा : Nashik Rang Panchami : रहाड रंगपंचमीत तरुणाईचा गोंधळ; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, वाचा सविस्तर