मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असून या काळात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवेची गरज भासत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी ही कोविड-19 च्या रुग्णालयात सेवा द्यावी, असा आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने काढला आहे.
मुंबई परिसरात जवळ-जवळ 25 हजार खासगी दवाखाने चालवणारे डॉक्टर्स आहेत. नागरिकांना वैद्यकीय सेवेची गरज असताना ही खाजगी डॉक्टर आपली सेवा बजावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी ज्या ठिकाणी कोविड-19 आजारावर उपचार सुरू आहेत, त्या रुग्णालयात कमीत-कमी 15 दिवस आपली सेवा द्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात आणि देशात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक कायद्याची अंमलबाजवणी सुरू आहे. या कायद्यनुसार जे खासगी डॉक्टर्स आपली सेवा बजावणार नाहीत, अशा डॉक्टरांना कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच अधिक-कडक कारवाई केल्यास त्यांचे परवानेही रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. मुंबई परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने खासगी डॉक्टरांना ही विनंती करण्यात येत आहे. पण, याला प्रतिसाद न मिळाल्यास शासनाला कारवाई करावी लागेल, असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
ज्या खासगी डॉक्टरांना कोणताही आजार नाही, तसेच ज्यांचे वय 55 वर्षपेक्षा कमी आहे. अशा डॉक्टरांनी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा, आहे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.