मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर सर्वच इच्छूकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याच प्रमाणे सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यांनी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडाळात साडेचारशे कोटी रुपयांचा घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या कदम यांनी निवडणूक लढवण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा - पवार यांच्या विरोधातील कारवाई तर सूड बुद्धीने; मराठा क्रांती मोर्चाने दर्शवला निषेध
विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी जामीन द्यावा, अशी याचिका रमेश कदम यांचे वकील नितीन प्रधान यांनी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या खंडपीठाकडे केली होती मात्र न्यायालयाने ही याचिका योग्य ठिकाणी दाखल करावी, अस म्हणत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर जाण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे महामंडळाच्या अध्यक्ष पदावर असताना तब्बल साडेचारशे कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी सीआयडीकडून चौकशी करण्यात येत होती. याप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सीआयडीने दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सध्या रमेश कदम हे आर्थर रोड तुरुंगात आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव