मुंबई - केवळ मजुरीचे 150 रुपये देण्यास टाळाटाळ करतोय म्हणून रियाज मोहम्मद ट्राफिक शेख (28) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मुंबईतील शिवडी परिसरात घडली. 16 मे रोजी शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत पेट्रोलियमच्या गेट समोरील फुटपाथवर ठेवलेल्या पाईपमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती शिवडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान मृत रियाज याच्या भावाने पोलिसांना माहिती दिली की, काही दिवसांपूर्वी मासे विक्रीच्या मजुरीवरून चुलबूल नावाच्या युवकासोबत भांडण झाले होते. यावेळी हुसेन तयेबी शेख उर्फ चुलबूल (22 ) याने मृत रियाज बघून घेईन म्हणून धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी या संदर्भात आरोपी चुलबूल याचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता तो भाऊचा धक्का या ठिकाणावरील समुद्रातील बोटीत लपून बसला असल्याचे पोलिसांना आढळून आले. मासे विक्रीच्या मजुरीचे 150 रुपये सतत मागूनही मृत रियाज देत नसल्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलीस चौकशीत दिली आहे.