मुंबई : आरोपीच्या आत्महत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या प्रकरणात हलगर्जीपणा करणार्या पोलिसांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दीपक हा बोरिवलीतील डॉन बॉक्सो स्कूलजवळील रामचंद्र भंडारी चाळीत राहत होता. त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात मारामारीसह गंभीर दुखापत, शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला बुधवारी २६ जुलैला पोलिसांनी अटक केली होती.
न्यायालयात हजर करण्यापूर्वीच केली आत्महत्या : दीपकला अटकेनंतर बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला शुक्रवार २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्याला बोरिवलीतील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी म्हणजेच आज त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत होती. त्यामुळे त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. दरम्यान, आज सकाळी सव्वाआठ वाजता त्याने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याचे सहाय्यक फौजदार दराडे यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी ती माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली होती.
दीपक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार : या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दीपकला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दीपक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सहा वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यात नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी सुरू असताना तो जामिनावर बाहेर आला होता.
मानसिक नैराश्यातून आत्महत्या : गेल्यावर्षी त्याच्याविरुद्ध गंभीर दुखापतीसह मारामारीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाल्याने त्याला कोर्टात अर्ज करून ताबा घेण्यात आला होता. याच गुन्ह्यात पोलीस कोठडीत असताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र, जेलमध्ये राहत असताना त्याला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यातून त्याने आत्महत्या केली, असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. दुसरीकडे लॉकअपमध्ये झालेल्या या आत्महत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. तिथे पोलीस बंदोबस्त असताना दीपकने आत्महत्या कशी केली. याबाबत पोलिसांनी हलगर्जीपणा झाला आहे का, याचा आता पोलीस तपास करत आहेत. त्याचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. दोषी पोलिसांवर सक्त कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा: